पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर येवून ठेपली असून निवडणूक विभागातर्फे आता निवडणूक साहित्य खरेदीचीही लगबग सुरु झाली असून विविध प्रकारच्या साहित्य खरेदीच्या निविदा लवकरच काढण्यात येत आहेत.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आवश्यक असते. निवडणूक काळात ते उपलब्ध होण्यासाठी त्याची खरेदी करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेच्या भांडार विभागाकडून साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात
येत आहे.
त्यामध्ये मतदार याद्या, मतपत्रिका, चित्रीकरणासाठी कॅमेरे व व्यक्ती, स्टेशनरी, शिक्के आणि 167 प्रकारचे साहित्य (मतदानाच्या दिवशी लागणा-या लहान-मोठ्या विविध वस्तू) यांची खरेदी भांडार विभाग करणार आहे.
या साहित्यासाठी 8 ते 10 कोटी रुपयांचा खर्च होईल, असा अंदाज आहे. मागील 2012 च्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेने साहित्यात, तसेच त्यांच्या किमती व मानधनातही वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत खर्च वाढण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणूक, तसेच ग्रामीण भागातील नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर लगेचच महापालिका निवडणुककांचे बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग व पालिकेच्या निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे.