आजच्या तरुण पिढीला जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी – विलास लांडे
पिंपरी :- छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. गुलामगिरीच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी समशेर उचलली. पण शिवरायांच्या कार्यामागे खरी प्रेरणा होती ती त्यांच्या मातोश्री जिजाऊंची. जिजाऊंचे धाडस, शौर्य, दूरदृष्टी, वाखाणण्यासारखे आहे. आजच्या तरुण पिढीला जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी आहे असे विचार राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विलास लांडे यांनी व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळ व प्रबोधन परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन यात्रेच्या लोगोचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्याख्याते गणेश शिंदे मनोगत व्यक्त केले. प्रेरणा प्रबोधन व परिवर्तन यासाठी काम करणारी प्रबोधन परिवार ही संस्था असून, प्रबोधन परिवाराच्या माध्यमातून विविध विषयांवर सातत्याने प्रबोधनाचे कार्य केले जाते. त्याच कार्याचा एक भाग म्हणून यावर्षी 1 जानेवारी ते 12 जानेवारी कालावधीत जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने या प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे गणेश शिंदे यांनी सांगितले.
या प्रबोधन यात्रेतून राज्यभरात अनेक तरुण सहभागी होणार असून महान कार्य करणाऱ्या जिजाऊंच्या चरित्रातून तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करणे हाच यात्रेचा उद्देश आहे. याप्रसंगी जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुधीर मुंगसे, प्राचार्य अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.