पिंपरी :- आकुर्डीतील पांढरकर नगर येथील लोहमार्ग परिसरात आज मंगळवारी (दि. ६) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास अगरबत्तीच्या कंपनीला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील पत्रा शेडच्या काही घरांना त्याच्या झळा बसून मोठे नुकसान झाले. आगीचे लोट आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
जवळच शाळा असल्याने शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
मात्र अग्निशामक दल पोलीस आणि महापालिका अधिकारी यांच्याकडून दिलासा दिला जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.