पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ साठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांनी आज थेरगांव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या साठी दि.२६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एस. सत्यनारायण आणि अनिल किशोर यादव यांनी थेरगांव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील प्रत्येक कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी करून संबंधितांना सूचना केल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक संदर्भातील केलेल्या कामकाजाची माहिती दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, निवडणूक सहायक नागेश गायकवाड तसेच विविध कक्षांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगांव या ठिकाणी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रुम तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणास एस. सत्यनारायण आणि अनिल किशोर यादव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था आणि सुविधांचा आढावा घेतला. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, कक्ष प्रमुख बापूसाहेब गायकवाड, आबासाहेब ढवळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, पोलीस उपआयुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले तसेच विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था तसेच विविध सुविधांचे सूक्ष्म नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी यावेळी दिले. मतदानाच्या तसेच मतमोजणी दिवशी वाहतूक व्यवस्थापनाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.