माजी नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्यावतीने आयोजन
पिंपरी : भारत रत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिन व दास नवमी, मराठी भाषा दिनाचे औचित्य् साधून माजी नगरसेविका शर्मिला राजेंद्र बाबर यांच्यावतीने दि. ११ फेब्रुवारी रोजी मनोहर वाढोकर सभागृह, प्राधिकरण येथे “इये मराठीचीये नागरी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शब्द रंग कला साहित्य कट्टा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. नुपूर नृत्यालयच्या संचालिका डॉ. सुमेधा गाडेकर यांनी त्यांच्या 45 शिष्यांसह अतिशय बहारदार कार्यक्रम सादर केला. गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
दास नवमीचे विशेष औचित्य साधून मनाचे श्लोक सादर करण्यात आले. मोगरा फुलला आणि रंगा येई या लता दीदींनी गायलेल्या गाण्यावर उत्तम नृत्य सादरीकरण यावेळी झाले. मराठी भाषेचे वैविध्य दाखवणारी पाऊस गीते सादर, यामध्ये 5 वर्षांपासून 50 वर्षे वयाच्या कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यात ए आई मला पावसात जाऊ दे, घन घन माला नभी दाटल्या, ऋतू हिरवा अशा अवीट गोडीच्या गाण्यावर नृत्य प्रस्तुती करण्यात आली. कुसुमाग्रजांच्या ओळखलंत का सर मला….या कवितेवर ही नृत्य सादर करण्यात आली.
पावनखिंड या चित्रपटातील शिवरायांच्या गाण्यावर सादर झालेल्या नृत्य प्रस्तुतीला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. घेई छंद मकरंद या कट्यार काळजात घुसली या लोकप्रिय चित्रपटातील गाण्यावर सादर करण्यात आलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी दाद दिली. अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेल्या “माऊली माऊली” या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ज्योती कानेटकर यांनी केले. मधूश्री कला आविष्कारच्या माधुरी ओक, शब्दरंग कला साहित्य कट्टाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.