पिंपरी : राष्ट्रवादीने पुणे मेट्रोसाठी सतत पाठपुरावा केला आहे. या प्रकल्पासाठी शरद पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान आणि नगर विकास मंत्र्यांची भेट घेऊन मेट्रो प्रकल्प पुढे नेला. तसेच महापालिकेचा मेट्रोच्या खर्चातही मोठा वाटा आहे. त्यामुळे मेट्रोचे भूमिपूजन मोदींच्या नव्हे तर पवारांच्या हस्ते करावे, अशी मागणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
मेट्रो प्रकल्पासाठी शरद पवार व अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शहराशी संबंधित प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा उद्घाटनांचे कार्यक्रम हे पक्षनेत्यांच्या बैठकीत आणि महापौरांच्या अधिकारातच ठरतात. त्यामुळे भाजपने राजकारण करू नये. अडीच वर्षे केंद्रात मेट्रोचा प्रस्ताव प्रलंबित होता. 2008 पासून राष्ट्रवादीतर्फे मेट्रो होण्यासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्यात आला.
मेट्रो प्रकल्पासाठी 60 टक्के वाटा पुणेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा असेल. त्यामुळे 20 टक्के निधी देणाऱ्या केंद्र सरकारने श्रेय घेऊ नये. ठराव आमचा, प्रकल्प आमचा मग श्रेयवाद कशाला, असा सवाल उपस्थित करत राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोपही वाघेरे यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास 22 लाखांवर गेली असून या शहरात मेट्रो सेवा चालू करण्याच्या बाबतीत मागील सरकारच्या काळात मंजुरी मिळाली व तेव्हापासून या 8 वर्षांच्या काळात पुणे मेट्रो चालू करण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच प्रस्तावानुसार ही मेट्रो आंबेडकर चौक, पिंपरीपर्यंतच येणार आहे. ही मेट्रो भक्ती-शक्ती चौकापर्यंत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.