पिंपरी :- जुनी सांगवी येथील महापालिकेची गॅस दाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी २० जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती ह क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ यांनी दिली आहे. जुनी सांगवी परिसरात दापोडी, फुगेवाडी, सांगवी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी येतात. याठिकाणी महापालिकेने गॅस दाहिनी सुरू केली आहे.
या गॅस दाहिनीच्या दुरूस्तीची आवश्यकता असल्याने दि.१४ जुलै ते २० जुलै या कालावधीत ही दुरूस्ती केली जाणार आहे त्यामुळे गॅस दाहिनी बंद ठेवली जाईल. दुरूस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने रिफ्र्याकटरी बदलणे, भट्टीचा दरवाजा दुरूस्त करणे, बर्नर, वायर्सची कामे तसेच इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत. या गॅस दाहिनीचा चालन देखभालीचा ठेका मेसर्स कल्याणी एंटरप्राईझेस यांच्याकडे असून ही सर्व कामे त्या एजन्सीकडून केली जाणार आहेत. या कामातील रिफ्र्याकटरी बदलण्याच्या कामास अधिक वेळ लागणार असून त्यासाठी गॅस दाहिनी कमीत कमी १ आठवडा बंद ठेवावी लागणार आहे. ही सर्व कामे संबंधित एजन्सीकडून केली जाणार आहेत. नागरिकांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.