पिंपरी चिंचवड – पिंपरीत घराजवळ निवडणुकीची चर्चा करण्यास नकार देणाऱ्या महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री साडेअकराच्या सुमारास भीमनगर भाजी मंडईजवळ घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
शीतल सचिन सुर्वे (वय 30, रा. भीमनगर भाजी मंडई जवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गौतम विष्णू रोकडे (वय 45), प्रवीण भीमराव वडमारे (वय 40), सुनील विष्णू रोकडे (वय 38), संगीता प्रकाश गायकवाड (वय 45, सर्व रा. भीमनगर भाजी मंडई जवळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान झाल्यानंतर आरोपी हे फिर्यादी शीतल यांच्या घराजवळ ‘पिंपरी विभागातून कोण निवडून येणार’ याबाबत चर्चा करत होते. शीतल यांनी सर्वांना ‘घराजवळ चर्चा करू नका’ असे सांगितले. याचा राग मनात धरून चौघांनी शीतल यांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत झटपट केली. यामध्ये शीतल यांच्या हाताला दुखापत झाली. पिंपरी पोलिसांनी आरोपी गौतम याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.