चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल केव्हा लागणार, याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, राज्यातील नऊपैकी एकाही विभागीय मंडळाकडे अद्याप १०० टक्के उत्तरपत्रिका जमा झालेल्या नाहीत. उत्तरपत्रिका जमा झाल्यावर ३० ते ४० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या निकालास जुलै महिना उजाडणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम एक महिना ठप्प होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामास वेग आला असून राज्य मंडळाकडे उत्तरपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० मे पर्यंत शंभर टक्के उत्तरपत्रिका जमा करण्याचे वेळापत्रक काही विभागीय मंडळांकडून आखण्यात आले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उत्तरपत्रिका जमा करण्यास अडचणी येत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व उत्तरपत्रिका जमा होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुणे मंडळाकडे ३० टक्केच उत्तरपत्रिका नऊ विभागीय मंडळांपैकी एका मंडळाचा निकाल मागे राहिला तरी राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. सध्या मुंबई, पुणे, नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील उत्तरपत्रिका जमा करण्यास अडचणी येऊ शकतात. सध्या पुणे विभागीय मंडळाकडे दहावीच्या ३० टक्के व बारावीच्या ४० टक्के उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत. औरंगाबाद विभागीय मंडळाकडे दहावीच्या ३० तर बारावीच्या ७२ टक्के उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत. उर्वरित सर्व विभागीय मंडळाकडे ७८ ते ९८ टक्क्यांपर्यंत उत्तरपत्रिका जमा झाल्या असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एक किंवा दोन विभागीय मंडळामुळे पूर्ण राज्याचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here