पिंपळनेर– प्राचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन योजना मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमास शालेय समन्वयक राहुल आहिरे सर तसेच शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता मॅडम यांनी सुरेखपणे केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष भाषण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महात्मा फुले यांच्या कार्यावर आपले विचार मांडले. प्रमुख भाषण किरण मॅडम यांनी केले. आपल्या भाषणातून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणप्रेम, समाजसुधारणा आणि समतेच्या विचारांचे महत्त्व प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. या वेळी राहुल आहिरे सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर्श ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन केले. तसेच अनीता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समता, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचे मूल्य जपण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमातील छायाचित्रणाची जबाबदारी मयुरी मॅडम यांनी सांभाळली, तर बातमी लेखन प्रेरणा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सायली मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. फळ्यावर आकर्षक सजावट निकाळे मॅडम आणि पवार सर यांनी साकारली, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक शोभा आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्याची ओळख करून देत त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि मूल्यसंस्कार देणारा ठरला.
























