चौफेर न्यूज – कोरोना विषाणूमुळे NEET आणि JEE Main 2020 या परिक्षा रखडल्‍या गेल्‍या आहेत. NEET आणि JEE Main 2020 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं.

येत्या सप्टेंबर महिन्यात NEET आणि JEE Main 2020 परीक्षा नियोजित आहेत.मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. कोरोनावरील लस लवकरच येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्टच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. आम्ही अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत नसून फक्त काही वेळा ती पुढे ढकलली जावी अशी विनंती करत असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील अलख यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, यंदाची NEET आणि JEE परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल. याशिवाय कोरोना संकटात आयुष्य पुढे चालत राहिलं पाहिजे, आपण फक्त परीक्षा थांबवू शकतो का ? आपण पुढे चालत राहिलं पाहिजे असं मत परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरील याचिकेवर बोलताना न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी नोंदवलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here