चौफेर न्यूज – देशातील कोरोना स्थितीसंदर्भात मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली. यावेळी त्यांनी कोरोना लसीवरही भाष्य केले. ते म्हणाले, देशात कोरोनाच्या तीन लसींवर काम सुरू आहे. यांपैकी एक लस आज अथवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. मात्र, लस केव्हापर्यंत तयार होईल यासंदर्भात माहिती देण्यात आली नाही. याशिवाय, ऑक्सफर्डची कोरोना लस याच आठवड्यात परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल, असेही यावेळी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोना लसीसंदर्भात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले, की “देशात कोरोनाच्या तीन लसींवर काम सुरू आहे. हे काम वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू आहे. यांपैकी एक लस आज अथवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत.”
डॉ. व्हीके पॉल म्हणाले, “पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणाले होते, की भारतात तीन लसी तयार केल्या जात असून वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचे काम सुरू आहे. यांपैकी एक आज अथवा उद्या तिसऱ्या टप्प्यावर पोहोचेल. तर इतर 2 लसी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत.”
आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की “आतापर्यंत देशात एकूण 3 कोटीहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत जवळपास 9 लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने सांगितले, की आतापर्यंत जवळपास 19 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर मृत्यू दर 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.”
आरोग्य मंत्रालयाचे राजेश भूषण म्हणाले, “रोज साधारणपणे 55 हजार रुग्ण बरे होत आहेत. दैनंदीन पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांवरून 7.72 टक्क्यांवर आला आहे. आता साप्ताहिक मृत्यू दर 1.94 टक्के आहे. आमचे लक्ष्य मृत्यू दर 1 टक्क्यापेक्षा कमी करणे आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोज जवळपास 2 लाख टेस्ट केल्या जात होत्या, तर आता हा आकडा 8 लाख टेस्टवर पोहोचला आहे.”
भारतात तीन लसींची चाचणी सुरू
15 ऑगस्ट रोजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले की, देशात कोरोना लसीवर काम सुरू आहे. भारतात सध्या कोरोनाच्या दोन लसीची चाचणी सुरू आहे, तर एका लसीची चाचणी सुरू होणार आहे. देशातील तिसरी लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाची आहे, ज्यास भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून मदत केली जात आहे. देशातील इंडिया बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे नाव कोरोवॅक्सिन आहे. देशातील दुसरी लस झयडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडची आहे.
भारतात कधीपर्यंत येणार लस?
आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी संसदीय स्थायी समितीच्या गृह मंत्रालयाला सांगितले की, भारत बायोटेक, कॅडिला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली लस वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. भारत बायोटेक आणि झाइडस कॅडिला यांनी तयार केलेली लस क्लिनिकल चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण करण्याच्या जवळ असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी असे सूचित केले आहे की सरकारने निर्णय घेतल्यास लस लवक9र विकसित करण्यासाठी आपत्कालीन मंजुरीचा विचार केला जाऊ शकतो.





















