चौफेर न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात गेले काही महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शाळा, कॉलेज बंद होते. मात्र केंद्र सरकारने आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून देशातील १० राज्यांमध्ये अटी शर्थींसह शाळा सुरू करण्यात येणार आहेत. Unlock 4 सुरू झाल्यापासून अनेक व्यवहार, गोष्टी पुन्हा पूर्वपदावर आणण्याकरता प्रशासन प्रयत्नशील आहे. तर आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये १०० लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देण्यात आली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.
बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून ५० टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्यात येणार नाहीत. तसेच देशातील १० राज्यांमध्ये योग्य ती काळजी घेऊन इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, फक्त कन्टेन्मेट झोनमध्ये न येणाऱ्या शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच कन्टेन्मेट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेत येण्याची परवानी नाही. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शाळा सुरु होणार, मात्र या असणार अटी
- फक्त ५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह शाळा सुरू होणार
- पालकांच्या लेखी परवानगीने विद्यार्थी शाळेत येऊ शकतील
- शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल
- सध्या ज्या शाळा कन्टेन्मेट झोनमध्ये नाहीत त्याच सुरू होणार
- कन्टेन्मेट झोनच्या बाहेर असणाऱ्या शाळांमध्येही फक्त त्याच विद्यार्थी आणि शिक्षकांना परवानगी देण्यात येणार जे कन्टेन्मेट झोनमध्ये राहत नाहीत.
- शाळेत येणारे विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांनाही कन्टेन्मेट झोनमध्ये जाण्याची परवानगी नाही.
- कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व उपाय केले जातील, तसेच सर्व अटी शर्थींचं पालन करण्यात येईल
- मास्क आणि सोशल डिस्टंन्सिग बंधनकारक असणार आहे





















