चौफेर न्यूज – करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून शहरातही रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सोमवारी तब्बल दहा महिन्यांनंतर शाळांची घंटा वाजली. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. शाळा प्रशासनांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारची काळजी घेतली आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासाठी परिशिष्ठ अ व ब यांमध्ये काही नियम घालून दिले आहेत. अनेक शाळांनी या नियमांची पूर्तता करत आज दहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शाळेचे प्रवेशद्वार उघडले.

पिंपरी चिंचवड शहरातील नववी ते बारावीचे वर्ग दहा महिन्यानंतर सुरू झाले. त्यामध्ये खासगी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. तर पालिकेच्या 18 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची समाधानकारक उपस्थिती होती. प्रवेशद्वारावरच सर्व विद्यार्थ्यांचे तापमान तपासले जात होते तसेच सॅनिटायजरच्या स्टॅण्डची व्यवस्था केली होती. शाळा सुरू करण्यापूर्वीच शाळेतील सर्व बेंच, टेबल, खुर्च्या व भिंतींचे सॅनिटायजेशन केले होते. जागोजागी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था केलेली आढळून आली. मात्र पालकांच्या मनात करोनाविषयी अद्याप भीती कायम असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्हते.

बहुतांश खासगी शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या नाहीत. शाळा प्रशासनांनी संपूर्ण तयारी केल्यानंतरच त्यांना शाळा सुरू करता येणार आहेत शहरामध्ये नववी ते बारावीच्या 258 शाळा आहेत. त्यापैकी अनेक शाळा आज सुरू झाल्या नाहीत. सर्व नियमांची पूर्तता, शाळांचे सॅनिटायजेशन व शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतरच या शाळा सुरू होणार आहेत. पुढील सोमवार पर्यंत या शाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी माध्यमिक शाळेमध्ये सर्वाधिक 67.92 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्याखालोखाल माध्यमिक विद्यालय खराळवाडी या शाळेत 54.69 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. तर सर्वात कमी रुपीनगर येथील माध्यमिक विद्यालयात 6.75 टक्के तर नेहरूनगर शाळेत 6.76 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अठरा शाळांमध्ये आज पहिल्या दिवशी 577 मुले तर 758 मुली असे 1335 म्हणजेच 32.50 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

शहरातील शाळांमध्ये किती विद्यार्थी हजर होते, किती पालकांचे संमतीपत्रक आले. याबाबत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. आज रात्री उशिरा त्यावर माहिती संकलित होईल. त्यामध्ये संपूर्ण माहिती समजेल. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये सर्व शाळा नियमितपणे सुरू होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here