चौफेर न्यूज – केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २८ जानेवारी रोजी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) चर्चा करण्यासाठी हा ऑनलाइन वेबिनार झाला होता. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली.
पोखरियाल यांनी यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे २०२१ रोजी सुरू होणार आहेत. १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा संपणार आहेत. १५ जुलै २०२१ पर्यंत सीबीएसई परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण त्यावेळी विस्तृत वेळापत्रक जारी करण्यात आलं नव्हतं.
गुरुवारी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसईद्वारे दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार असल्याची माहिती दिली. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च २०२१ पासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्ड आपलं अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक अपलोड करणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या आयोजनासाठी अनेक प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणार आहे. यावर्षी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मूल्यांकन प्रक्रियेसाठी मूल्यांकन केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे.