चौफेर न्यूज – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत, व सन २०२०–२१ मध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
कोरोना महामारीमुळे यंदा शाळा सुरु होण्यास नवीन वर्षच उलटले, तरीही महाविद्यालये अद्यापही सुरु झालेले नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांची शाळा आणि महाविद्यालयातील 75 टक्के उपस्थिती शक्य होणार नव्हती.
यामुळे शिष्यवृत्ती मिळण्यास विद्यार्थ्याना अडचण निर्माण होणार होती. ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहेत.
सन 2020-21 या वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता, शिष्यवृत्ती फ्री शीप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व इतर शिष्यवृत्ती योजनांच्या लाभाकरीता विद्यार्थांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरावी. तसेच, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात आले आहेत.