चौफेर न्यूज – कोरोनामुळे राज्यातील शालेय आणि माध्यमिक परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. यातच आता दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेत खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रकही बदलेले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेत खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत वाढवून देत सुधारित तारखा जाहीर झाल्या आहेत. या सुधारित तारखांप्रमाणे सोमवार २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन दहावी साठी https://form17.mh-ssc.ac.in या लिंकवर लिक्ल करुन अर्ज करु शकता. तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्जही ऑनलाइन पद्धतीने नियमित व विलंब शुल्कासह स्वीकारण्यात येणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांमार्फत भरावे. माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांतील शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज भरताना कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सरकारने व विशेषतः आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.