चौफेर न्यूज – राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. सुमारे 35 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्यात येणार असून त्याबाबतचे वेळापत्रकही राज्य मंडळाने जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे, तर बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. दरम्यान दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्या, परीक्षा पुढे ढकलाव्यात, विद्यार्थ्यी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत त्या ठिकाणी परीक्षा केंद्राची व्यवस्था करून परीक्षा घेण्यात याव्यात, अशा प्रकारच्या मागण्या व चर्चा होऊ लागल्या.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेही काही विद्यार्थी, पालकांकडून मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही विविध मेसेजस व्हॉयरल होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, राज्यमंडळाकडून हा संभ्रम दूर करण्यात आला आहे.

राज्य मंडळाने ऑफलाइनद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षेला आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडेच लक्ष केंद्रीत करावे. चांगला अभ्यास करावा. परीक्षा कशा होणार व कुठे होणार याचा विचार करण्यात वेळ घालवू नये. करोनाची आताची परिस्थिती पाहून परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेता येणार नाही. वेळापत्रकानुसार परीक्षेच्या आधीची परिस्थिती पाहून योग्यवेळी योग्य ते निर्णयही घ्यावे लागतील, असेही दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here