चौफेर न्यूज – दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी अनेक पालक आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी, तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जात असतात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येण्यास आणि त्यांना परीक्षा केंद्राबाहेर फार काळ थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्रावर येणार्‍या पालकांना परीक्षा केंद्राबाहेर थांबता येणार नसल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ, लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक कार्य, परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा, परीक्षा देताना घ्यावयाची दक्षता आदी महत्त्वाचे बदल केले आहेत.

पेपर सुरु होण्याअगोदर केंद्रावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य मंडळाने कडक उपाययोजनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राबाहेर पालकांच्या वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी केंद्रावर पालकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकांवर आधारित विशिष्ट लेखनकार्य प्रकल्प, प्रात्यक्षिक वही व गृहपाठ यासंदर्भात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना पालकांना परीक्षा केंद्रावर मज्जाव करण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

तसेच शाळांना स्वच्छता आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्रात्यक्षिकांवर आधारित कार्य लेखी परीक्षेनंतर दिनांक २१ मे ते १० जून या कालावधीत द्यावे लागणार आहे. अधिक आणि सविस्तर माहिती https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर पाहता येतील. प्रात्यक्षिक वही जमा करण्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यास करोनाची लागण झाली असल्यास अथवा त्रास होत असल्यास प्रात्यक्षिक वही जमा करण्यास १५ दिवसापर्यंत मुदतवाढ मिळेल. श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here