चौफेर न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईसह राज्यात वाढत असून मुंबई विद्यापीठाने आपल्या अखत्यारीत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षारक्षक आदींना कोरोनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची साधने तातडीने पुरवावी अशी मागणी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांची भेट घेत याविषयीचे निवेदन दिले. त्यावर कुलगुरूंनी पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. विद्यापीठाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याकडे असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना विविध प्रकारची साधने आणि सोयी पुरवण्यासाठी आपत्कालीन निधीचा वापर करता येतो. त्यामुळे विद्यापीठाने या काळात आपल्याकडे असलेल्या या निधीचा वापर करून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात असलेल्या सर्व महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना तातडीने कोरोनापासून सुरक्षा होण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मामीटर आदी सुरक्षा साधनांचे वाटप करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.