चौफेर न्यूज – जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची ताजी क्रमवारी ‘क्यूएस युनिव्हार्सिटी रँकिंग’ आज जाहीर झाली. त्यात पवईच्या आयआयटी मुंबईने जगात 172 वा क्रमांक पटकावला असून देशातील विद्यापीठांमध्ये मात्र नंबर वन ठरली आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसने (आयआयएससी) देशात दुसरा तर आयआयटी दिल्लीने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
आयआयटी मद्रास आणि आयआयटी खरगपूर या क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मागे पडले आहेत. जागतिक क्रमवारीत आयआयटी मद्रासने 275 वा क्रमांक पटकावला. गेल्या वर्षी ती 271 व्या क्रमांकावर होती. आयआयटी खरगपूर गेल्या वर्षी 281 व्या क्रमांकावर होती ती यावेळी 314 व्या क्रमांकावर पोहोचली. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी 291 व्या क्रमांकावर असलेली आयआयटी कानपूर यंदा 350 व्या क्रमांकावर ढकलली गेली. आयआयटी रुरकीने आपली जागा गेल्या वर्षीप्रमाणे 383 व्या क्रमांकावर कायम ठेवली आहे.
या निकषांवर टक्केवारी देऊन ठरते क्रमवारी
शैक्षणिक प्रतिष्ठा (40 टक्के), संस्थेची प्रतिष्ठा (10 टक्के), शिक्षक-विद्यार्थी सरासरी (20 टक्के), शिक्षकांची कामगिरी (20 टक्के), परदेशी शिक्षकांची सरासरी (5 टक्के), परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी (5 टक्के)
जगातील प्रथम तीन सर्वोत्कृष्ट विद्यापीठे
- मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिका
- स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया
- हार्वर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका