चौफेर न्यूज – गेल्या वर्षभरात पहिली ते नववीच्या शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, जिह्यातील पहिले ते नववीच्या 7 लाख 2 हजार विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर श्रेणी- उत्तीर्ण अथवा पास याऐवजी ‘वर्गोन्नत’ असा शेरा मारून त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे प्रारंभी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद होत्या, परंतु ऑक्टोबर, नोव्हेंबर 2020 पासून काहीशी परिस्थिती निवळल्यानंतर प्रारंभी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग हळूहळू सुरू करण्यात आले. मात्र, पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा वर्षभर बंद होत्या. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद कराव्या लागल्या. पुढे शासनाने पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय घेतला.

यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या, तरी या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत शिक्षण विभागाने अद्यापि निर्णय घेतलेला नाही. मात्र, पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पदोन्नत करण्यात आले आहे. दरम्यान, दरवर्षी विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक तयार करताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर त्याचे गुण, श्रेणी, उंची, वजन, उपस्थिती अशा बाबी नमूद करत असत. मात्र, यंदा शाळा भरलीच नसल्याने आणि परीक्षाही होणार नसल्याने शासनाने पहिली ते नववीपर्यंत 7 लाख 2 हजार विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रगतीपुस्तकच बदलणार

प्रगतीपुस्तकावर यापूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवस, उंची, वजन, तसेच गुणवत्तानिहाय श्रेणी हा उल्लेख असायचा, परंतु आता असा उल्लेख असणार नाही. प्रगतीपुस्तकावर केवळ वर्गोन्नत असा उल्लेख असेल. यामुळे यंदा पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तकच बदलणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here