चौफेर न्यूज – सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली असून कॉलेजची इमारत बांधणी प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, तोपर्यंत कॉलेजची प्रवेश प्रक्रिया रखडू नये, प्रथम वर्ष सुरु व्हावे यासाठी पानमळेवाडी येथील सावकार कॉलेजमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सातारा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. या इमारतीची आणि कॉलेजसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधांची पाहणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असून, मेडिकल कॉलेजचे प्रथम वर्ष यंदापासून सुरु होईल, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. कॉलेजसाठीच्या ६२ एकर जागेचा प्रश्न सुटला आणि कॉलेजसाठी ४९५ कोटी रुपये निधी मंजूर झाला. दरम्यान, कॉलेजसाठी मंजूर असलेल्या जागेवर भव्य इमारत बांधली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया त्वरिव व्हावी आणि मेडिकल कॉलेज यंदाचं सुरु व्हावे, यासाठी सातारा मेडिकल कॉलेज पानमळेवाडी येथील सावकार कॉलेजच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरु करण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पथकाकडून या इमारतीची पाहणी येत्या काही दिवसात होणार आहे. त्यापूर्वी शिवेंद्रसिंहराजे यांनी या इमारतीची आणि सुरु असलेल्या तयारीची पाहणी केली.

शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड, निशांत गवळी, कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विजय झाड, डॉ. रचना शेगडे, डॉ. दीपक थोरात आदी उपस्थित होते. कॉलेजचे प्रथम वर्ष सुरु होण्यासाठी संगणक व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कॉलेजला १५ लाख रुपये मदत दिली होती. शिवेंद्रसिंहराजे यांनी या निधीतून खरेदी करण्यात आलेले साहित्य तसेच कॉलेजमधील सर्व हॉल, प्रयोगशाळा, ग्रंथालय, विद्यार्थी बैठक व्यवस्था, रुग्णालय आदींची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या.

अजित पवार यांच्या सहकार्यामुळे सातारा मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या काही दिवसात मेडिकल कॉलेजची भव्य आणि सुसज्ज इमारत उभी राहील मात्र तोपर्यंत कॉलेजची प्रवेश प्रक्रिया रखडू नये कॉलेज प्रत्यक्ष सुरु व्हावे यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सावकार कॉलेजमध्ये सातारा मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण सुरु करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पाहणीनंतर प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल आणि सातारा मेडिकल कॉलेज सुरु होईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here