चौफेर न्यूज – एखाद्या विद्यार्थ्याचे शालेय शुल्क भरले गेले नाही म्हणून त्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करू नका, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने मुंबई आणि परिसरातील खासगी शाळा व्यवस्थापनांना दिले आहेत.
कोरोना परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाइन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे ते बंद केले जाऊ नये असेही आदेशात म्हटले आहे. शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण शाळेने बंद केले असल्याबाबत पालकांचे तक्रार अर्ज या कार्यालयास प्राप्त होत आहेत. सबब शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घेण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे. यासोबतच शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत आदेश आहेत. सदर आदेशाची काटेकोरपणे पालन केले जावे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.





















