चौफेर न्यूज – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज (30 जुलै) जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घोषित केला जाणार आहे. विद्यार्थी आपला निकाल निकाल सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in किंवा cbse.gov.in यासह इतर प्लॅटफॉर्मवर देखील पाहू शकतात. विद्यार्थ्यांना फक्त आपला रोल नंबर टाकून निकाल पाहायचा आहे.
यंदा पहिल्यांदाच सीबीएसई बारावीचा निकाल हा परीक्षा न घेताच लावण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सीबीएसईने दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली नाही. खरं तर शेवटपर्यंत या परीक्षेबाबत बराच संभ्रम होता. अखेर शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत सीबीएसईची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यानंतर या परीक्षेचा निकाल नेमका कसा लागणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली राहिली होती. मात्र, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल लावला जाणार असल्याचं बोर्डाकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं.