चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2021च्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार (order) हे निकाल 31 जुलै 2021 रोजी जाहीर करायचे होते. मात्र या निकालाची तारीख (date) अद्याप बोर्डाकडून किंवा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
विद्यार्थ्यांनी ट्विटरवर मागितले उत्तर
निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून वर्षा गायकवाड यांच्याकडे याबद्दल उत्तर मागितले आणि यामुळे होणारी गैरसोय अधोरेखित केली. राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याकरिता या परीक्षांच्या निकालाच्या तारखांबद्दल त्यांनी विचारणा केली आहे. तसेच इतर पदवी अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे की नाही याबद्दलही त्यांनी विचारणा केली.
ट्विटरवर ट्रेंड झाला बारावी निकालाचा हॅशटॅग
विद्यार्थ्यांनी वर्षा गायकवाड यांना वेगवेगळे अहवाल बाजूला ठेवून निकालाची शेवटची तारीख जाहीर करण्याची मागणी केली आहे. काल संध्याकाळी हजारो विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतल्यामुळे #DeclareHSCResult हा हॅशटॅग काल ट्विटरवर ट्रेंड होत होता. अनेक विद्यार्थ्यांनी लिहिले आहे, ‘मॅडम, आम्ही निकालाची नाही, तर एका अंतिम तारखेची मागणी करत आहोत. निकाल कधी लागतील याची तारीख आम्हाला हवी आहे. बस. मॅडम, कृपया ही अनिश्चितता संपवा. #declarehscresult.’
सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीची विनंतीही नाही
मात्र यावर काही अधिकृत माहिती मिळालेली नाही, त्यामुळे अद्याप संभ्रम कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत उलटून गेल्यावरही ती वाढवण्याची कोणतीही विनंतीही सरकारने केलेली नाही. निकालाची तारीख जाहीर करण्यास सूत्रांनी नकार दिला आहे. 31 जुलै रोजी बोर्डाच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र काल निकाल जाहीर होण्याबाबत बोर्डाकडून मात्र कोणतेही अधिकृत विधान किंवा माहिती मिळालेली नाही.





















