चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावी ‘सीईटी’ ऑनलाइन अर्जासाठी सोमवारी (दि.2) रात्री मुदत संपणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज नोंदवणे आवश्यक आहे.
राज्यात 21 ऑगस्ट रोजी ‘सीईटी’ होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 20 जुलैपासून सुविधा उपलब्ध झाली. तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस संकेतस्थळ बंद होते. तांत्रिक खराबी दूर करून ते पुन्हा सुरू झाले. आतापर्यंत 11 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून यात आणखी काही वाढ होणार आहे.
अर्जात दुरुस्तीसाठीही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2 ऑगस्टनंतर अर्ज नोंदणी व माहितीत दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





















