चौफेर न्यूज – राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आता सर्व शाळा आणि महाविद्यालय परिसरात कोरोना चाचणी आणि लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र कोरोना चाचणीदरम्यान एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळलाच तर त्याला राज्य सरकारने कोरोनासंबंधीत ठरवून दिलेल्या नियमांनुसार क्वारंटाईन आणि उपचार केले जाणार आहे. तसेच संपर्कातील लोकांनाही क्वारंटाईन केले जाईल. पालिकेने स्पष्ट केले की, संबंधित शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतरचं लसीकरण आणि कोरोना शिबीराचे आयोजन केले जाईल. मात्र शाळा सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसात ७८० मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापैकी २०२ मुलं ९वर्षांखालील आहेत तर ५७८ मुलं १० ते १९ वयोगटातील आहेत.

यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाची गैरसोय न करता या शिबिरांचे आयोजन करण्यास पालिका तयार आहेत. आतापर्यंत शाळांमधून कोरोनाची कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत जी चांगली बाब आहेत, परंतु शाळा किंवा महाविद्यालय प्रशासनाला दिलेल्या एसओपीचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

“आम्ही शाळांमध्ये मुलांची चाचणी घेण्याची तयारी केली आहे. जर शाळांमध्ये दररोज स्क्रीनिंगदरम्यान कोरोनाची एकही संशयित केस आढळली तर आम्ही उर्वरित सर्व विद्यार्थ्यांच्या चाचण्या सुरू करु. मात्र शाळा किंवा महाविद्यालय प्रशासनानेही वॉर्ड स्तरावरील पालिकेच्या आरोग्य विभागाला कोरोना सारखी लक्षणे असलेल्या संशयित मुलांबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.

यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाविद्यालये आता सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाला त्यांच्या कॅम्पसमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करण्याची आवश्यकता असल्यास त्यांना बीएमसीला कळवावे लागेल. बीएमसी संबंधित महाविद्यालयात जाऊन १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करेल. मात्र महाविद्यालय प्रशासनाने पालिकेला विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी अर्ज केल्यानंतरचं ‘व्हॅक्सीनेशन ऑन व्हील्स’ शिबीर आयोजित केले जाऊ शकते. त्यामुळे मुंबईतील शाळा, महाविद्यालयांमध्ये कोरोनविरोधी चाचण्या, लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी पालिका तयार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here