बॉम्बस्फोटने शाळा उडवून देण्याची धमकी; सुरक्षा वाढविली
मुंबई– मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेमध्ये धमकीचा फोन कॉल आल्याने खळबड उडाली आहे. यामध्ये अज्ञात कॉलरने बॉम्बस्फोटने शाळा उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर शाळेच्या परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या लँडलाईनवर मंगळवारी साडेचार वाजता फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यामुळं काही वेळ येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या धमकीच्या फोननंतर काही वेळातच शाळेने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना काही वेळातच शाळेचा ताबा घेत, सर्व तपास यंत्रणा कामाला लावली. शाळेच्या तक्रारीच्या आधारे, अज्ञात कॉलरविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेत असून, लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचा कॉल आला होता. ज्या दरम्यान अज्ञात कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. आणि अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे मंगळवारी धमकीचा फोन कॉल करत शाळा उडवून देण्याची धमकी दिली आहे.