पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून शिक्षण मंडळाने चाळीस हजार विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात 13 प्राथमिक शाळा आहेत. जवळपास चाळीस हजारहून अधिक विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. इयत्ता पहिली ते आठवी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती विमा उतरण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावावर मंडळातील सर्व सदस्यांची चर्चेअंती एकसम्मती आल्यानंतर या ठरावाला 28 नोव्हेंबर रोजीच्या शिक्षण मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी मंडळाच्या चालू वर्षाच्या विद्यार्थी आरोग्य लेखा शिर्षावर वीस लाख रुपयांची तरतूद केली आहे, तसेच विमा उतरवण्यासाठी नामांकीत विमा कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड केली जाणार आहे. याबाबत आपण प्रस्ताव ठेवल्यानंतर जवळपास चार ते पाच कंपन्यांनी आपल्यासोबत पत्रव्यवहार केला आहे. त्यातील एका कंपनीची नियमाधीन राहून निवड केली जाणार आहे.
यासाठी प्रती विद्यार्थी 50 रुपये वार्षिक प्रिमियम प्रमाणे 40 हजार विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये पर्यंत खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे. याबाबत जाहीर प्रकटण करूनच विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढण्यात येईल. दैनंदीन 24 तासात विद्यार्थ्यांसोबत अपघात घडल्यास त्यांना हा विमा लागू होईल.