पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार अशी चर्चा होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर मार्च 2017 अशी माहिती मिळत असल्याने निवडणुका फेब्रुवारीमध्ये की मार्चमध्ये अशा चर्चा आणि अफवांना उधाण आले आहे.
मात्र राज्य निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावरील आगामी निवडणुका विभागातील महापालिका निवडणूकमधील स्थानिक स्वराज्य आणि वर्ष निहाय अहवालाच्या तक्त्यामध्ये पुणे विभागातील पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांसमोर मार्च 2017 असे लिहिल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. काही माध्यमांनी सरळ फेब्रुवारीची निवडणूक मार्चमध्ये असे जाहीर केले आहे.
या विषयी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवडणूक अधिकारी यशवंत माने म्हणाले की, महापालिकेकडे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे ती तारीख निवडणुकांचीच आहे, असे सांगता येणार नाही.