पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पवनाथडी या जत्रेसाठी 400 स्टॉलसाठी 600 अर्ज आल्याची माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.
पवनाथडी जत्रेमध्ये महिला बचत गटांना त्यांनी बनवलेल्या वस्तू विकता याव्यात यासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जातात. या स्टॉलसाठी महापालिकेने 400 स्टॉलसाठी 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान अर्ज मागवले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडे 600 अर्ज आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजने अंतर्गतमहानगरपालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच बचतगटांच्या उत्पादनांची सर्वांना माहिती व्हावी, बचतगटातील महिलांना विक्री कौशल्ये ज्ञात व्हावीत याकरिता पवनाथडीचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रेसाठी येणाऱ्या खर्चाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. नियोजनानुसार ही जत्रा गेल्यावर्षी प्रमाणे एचए मैदानावर भरवली जाणार असे बोलले जात असले तरी, महापालिका आयुक्तांकडे महापौर शकुंतला धराडे यांनी सांगवी भागात जत्रा भरवावी, अशी मागणी केली आहे. तर जत्रा भोसरी परिसरात भरवावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा गोफणे यांनी केली आहे. त्यामुळे तारखा ठरल्या, अर्ज आले मात्र जागा अद्याप ठरली नाही, असे काहीसे चित्र पहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला जत्रेसाठी अवघे काही दिवस उरले आहेत.