महापालिका सभेतील प्रकाराबाबत खाडे यांची दिलगिरी
‘माझ्यासह सीमा सावळे यांची नार्को टेस्ट करा!’
माझी दोन मुले अंध आहेत. त्यामुळे अंध बांधवांकडून मी पैसे कसे घेणार. पैसे घेणा-याला जनता बुटाने मारेल. निगडी सेक्टर 22 येथील नागरिकांना घरे देताना मी पैसे घेतल्याचा आरोप केला जातो. माझ्यावर आरोप करणा-यांची आणि माझी ‘नार्को टेस्ट’ करावी. त्यात मी दोषी आढळलो. तर, नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, नव्हे तर पुणे शहरबाहेर जाईन आणि पुन्हा शहरात परतणार नाही, असे आव्हान खाडे यांनी दिले.
पिंपरी : ठेकेदार मॅनेज झाला नाही की, माहिती अधिकारात माहिती काढून तोडपाणी करणे, हे नगरसेविका सीमा सावळे यांचे काम आहे. शिवसेनेमध्ये असताना सावळे यांनी टीडीआरची अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर त्या टीडीआरच्या प्रकरणावर मूग गिळून गप्प का बसल्या आहेत, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी खाडे यांनी केला. सावळे याच नव्या टीडीआर ‘क्विन’ झाल्या आहेत, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. तसेच दोन दिवसांपूर्वी सभागृहातील झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी खेदही व्यक्त केला.
पिंपरीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, नगरसेवक प्रशांत शितोळे, अजित गव्हाणे, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, पक्ष प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.
खाडे म्हणाले की, निगडी, सेक्टर 22 येथील गोरगरीब नागरिकांसाठी जेएनएनयूआरएमचा प्रकल्प पाठपुरावा करुन राबविला. महापालिकेच्या माध्यमातून त्याचे काम केले. सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना घरे मिळवून दिली. कोणत्याही एका व्यक्तीकडून एक रुपयाही घेतला नाही. मात्र, याच्या विरोधात सावळे कोर्टात गेल्या आणि त्यांनी गोरगरीब नागरिकांचा घास हिसकावून घेतला. सावळे यांनी माहिती अधिकारातून आजवर किती प्रकरणे बाहेर काढली आहेत. त्यापैकी किती तडीला लावली, असा सवाल खाडे यांनी केला. शहरातील अनेक प्रकल्पांची त्यांनी माहिती काढली होती. त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सभागृहात सीमा सावळे यांनी प्रथम शिवीगाळ केली होती, असा दावा खाडे यांनी केला. निगडीच्या घरकुल प्रकल्पाच्या विषय सर्वसाधरण सभेपुढे आल्यावर सावळे आणि माझ्यात नेहमीच तूतू-मैमै झाली आहे.