माजी नगरसेवक मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या अकार्यक्षम, गलथान आणि भ्रष्ट कारभारामुळे दिवसाआड पाणी पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे आयुक्तांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली.

याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला. सत्ताधारी भाजप व महापालिका पाणी पुरवठा अकार्यक्षम गलथान व भ्रष्ट कारभारामुळेच असा निर्णय घ्यावा लागला आहे. यामुळे शहरातील करदात्या नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास बसणार आहे. विशेषता महिलांना या निर्णयाचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे. यंदा पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. केवळ नियोजनाचा अभाव, अकार्यक्षम, भ्रष्ट कारभारामुळे पाणीपुरवठा विभागाचा खेळखंडोबा झाला आहे. महापालिकेतील विविध प्रकल्पाच्या निविदा, ठेके, त्यातील रिंग सल्लागारांच्या नियुक्त्या, थेट पद्धतीने कामे, त्यातून टक्केवारीचे राजकारणात सत्ताधारी भाजपा गुंग आहे. त्यामुळे पाणी, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यास वेळच नाही. सत्ताधारी भाजप व प्रशासन पैसा कमविणे, त्याच उद्देशाने काम करत आहेत. या शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळत आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम संवेदनाहीन सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. हा निर्णय जनतेच्या विरोधात असून त्वरित मागे घेण्याचे आदेश द्यावेत, तसेच आयुक्तांची त्वरित बदली करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here