पिंपरी:- भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सुरू केलेल्या “आपली हेल्पलाईन”ला अवघ्या महिनाभरातच नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हेल्पलाईनवर नागरिकांनी समस्या सांगताच त्यांच्या मदतीला आमदार लक्ष्मण जगताप धावून जातात आणि त्या समस्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेसह इतर शासकीय यंत्रणा दखल घेऊन योग्य निपटारा करत आहेत. त्यामुळे “आपली हेल्पलाईन”वर (7507411111) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सामान्यांचा विश्वास अधिकच वाढत आहे.
सरकारी कार्यालयातील काम करायचे असेल तर त्या कार्यालयाचे उंबरे झिजविण्याला पर्याय नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील सरकारी नियोजन संस्था असलेली महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी व इतर सरकारी कार्यालयेही त्याला अपवाद नाहीत. रस्त्याच्याकडेला असलेली विद्युत दिवे न लागणे, कधी-कधी दिवसाही सुरू असणे, डीपी बॉक्स उघडे असणे, गटारी उघड्या असणे, ते वारंवार तुंबणे, डासांच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष, भटक्या कुत्र्यांचा त्रास, रस्त्यांवरील खड्डे, पिण्याच्या पाण्याचा कमी दाबाने पुरवठा, पदपथांची दुरवस्था यांसह अनेक छोट्या मोठ्या समस्यांचे चित्र शहरात सार्वत्रिक पाहायला मिळते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सामान्यांना भेडसावणाऱ्या या समस्यांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी या मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप सरसावले आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आमदार जगताप यांनी “आपली हेल्पलाईन” सुरू केली आहे. मतदारसंघातील नागरिकांनी 7507411111 या मोबाईल क्रमांकांवर एखादी समस्या मांडल्यानंतर त्याचा शासकीय पातळीवरून त्वरित निपटारा करण्यात येत आहे. चोवीस तास सुरू राहणाऱ्या या “आपली हेल्पलाईन”वर आपल्या भागातील समस्या व्हॉट्सअप केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेतली जाते. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना “आपली हेल्पलाईन” आता आपली वाटू लागली आहे. नागरिकांकडून गेल्या महिनाभरापासून हेल्पलाइनला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या हेल्पलाइनवर नागरिकांनी केलेल्या शेकडो तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच इतर शासकीय कार्यालयांमार्फत निकाली काढण्यात यश आले आहे. “आपली हेल्पलाईन”मुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब हा सर्वसामान्यांच्या मनात असलेला शिक्का पुसण्यास मदत होत आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “चिंचवड मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्या सोडविण्यासाठी महिनाभरापूर्वी “आपली हेल्पलाईन” सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना ते राहात असलेल्या भागात अगदी छोट्या छोट्या समस्या भेडसावत असतात. त्या संबंधितांकडे मांडल्यानंतर सुटतीलच याची खात्री नसते किंवा समस्या सोडविण्यासाठी खूप वेळ लावले जाते. अनेकदा त्याची दखलही घेतली जात नाही. त्यामुळे समस्या मांडावी तरी कोणाकडे या गोंधळात नागरिक असतात. नागरिकांमध्ये हा गोंधळ उडू नये आणि त्यांना घरबसल्या आपली समस्या मांडता यावी आणि ती सोडविता यावी यासाठी चिंचवड मतदारसंघातील नागरिकांसाठी “आपली हेल्पलाईन” सुरू केली आहे.
मतदारसंघातील नागरिकांनी 7507411111 या मोबाइल क्रमांकांवर आपली समस्या मांडावी. महिनाभरापूर्वी सुरू केलेल्या या हेल्पलाईनकडे मतदारसंघातील नागरिकांनी आपापल्या भागात भेडसावणाऱ्या अनेक समस्या मांडल्या आहेत. त्या सर्व समस्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. या हेल्पलाईनमुळे आपली एखादी समस्या घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्यालय, प्रभाग कार्यालये किंवा इतर शासकीय कार्यालयांकडे हेलपाटे मारण्याची आता नागरिकांना गरज नाही. कोणत्याही विभागाशी संबंधित मतदारसंघातील तक्रारी नागरिकांना घरबसल्या या हेल्पलाईनवर नोंदविता येतील. तक्रारदाराने या हेल्पलाईनवर आपली तक्रार व समस्या व्हॉट्सअप केल्यानंतर त्याची नोंद घेतली जाते. तसेच तक्रार किंवा समस्या सोडविल्यानंतर त्याची माहिती संबंधित तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर पाठविली जाते. त्यामुळे चिंचवड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने आपल्या भागात कोणतीही समस्या असल्यास ती “आपली हेल्पलाईन”च्या 7507411111 या मोबाइल क्रमांकावर पाठवावी. ती समस्या सोडविली जाईल, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.