नाशिकला खासगी तसेच सरकारी रूग्णालयात मदतनीस डॉ. प्रतिक देवरे
चौफेर न्यूज – कोरोना महामारीत रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत नवीन ठिकाणी भेदरलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना रुग्णमित्र बनून साक्रीचा भूमिपुत्र डॉ. प्रतीक देवरे नाशिक येथे खासगी तसेच सरकारी रुग्णालयांत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. यामुळे केवळ तालुक्यातीलच नव्हे, तर तालुक्याबाहेरील कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळत आहे.
डॉ. देवरे यांनी यापूर्वी साक्री तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात पाच वर्षे रणसेवा केली. यासेवा काळातही त्यांनी तालुक्यातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. वैद्यकीय सेवेचे हे व्रत अखंड सुरू ठेवत, गेल्या दोन वर्षांपासून अर्थात, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आताच्या दुसऱ्या लाटेदरम्यान साक्री तालुक्यातीलच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातून उपचारासाठी आलेल्या शेकडो कोरोना रुग्णांना नाशिक येथे खासगी तसेच सरकारी रुग्णालयांत रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे. उपचारादरम्यान ब्लड, प्लाझ्मा मिळवून देणे, मोफत वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देणे आदी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत. आपल्या ग्रामीण भागातील गोरगरीब, अशिक्षित रुग्णांना नाशिक येथे आरोग्यासेवेच एक हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले आहे. डॉ. प्रतीक देवरे साक्री येथील ज्येष्ठ विधितज्ञ अॅड. व्ही. एन. देवरे व माजी मुख्याध्यापिका आशा हिरे-देवरे यांचे पुत्र, तर नवडणे येथील कृषिभूषण दिवंगत राजेंद्र ठाकरे यांचे जावई आहेत.
माझी ऑक्सिजन लेव्हल : ८५, HRCT score : १८/२५ होता. १८ मार्चला धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. अडचणी वाढल्याने डॉक्टरांनी इतरत्र हलवण्याचा सल्ला दिला. डॉ. प्रतीक देवरे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी कुठेच बेड शिल्लक नसताना केवळ एका तासात नाशिक येथे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिला. स्वतः डॉ. देवरे यांनी केवळ दहा मिनिटांत प्रवेशीत करून वैद्यकीयसेवा उपलब्ध करून दिली. उपचारांदरम्यान डॉ. देवरे स्वतः येऊन चौकशी करीत होते. तेथील डॉक्टरांशी संपर्क करून वेळोवेळी आम्हाला धीर देण्याचे काम त्यांनी केले.
– ज्योती सूर्यवंशी, दुसाणे, ता. साक्री
कोरोना महामारीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी कुणीतरी मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत, जमेल तेवढे काम स्वतः करून यापुढील काळातदेखील कुणाला नाशिक शहरात आरोग्यविषयक मदत लागल्यास संपर्क साधावा.
-डॉ.प्रतीक देवरे, ८२७५५६३१५८,७७०९४७४८००