मुंबई : राज्य सरकाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तीन दिवसांच्या मराठी तितुका मेळवावा – विश्व मराठी संमेलन 2023 याचा उद्घाटन सोहळा मुंबईत पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आदीं उपस्थित होते. दरम्यान, आजच्या दिवसात विश्व मराठी संमेलनात काल आज आणि उद्या असा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली.
दरम्यान, या सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केले. त्यानंतर आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील मराठी टक्का कमी होऊ देणार नाही, तर तो आम्ही वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. मूळ मुंबईतील रहिवाशी आज कल्याण, डोबिंवली, वसई, विरार या ठिकाणी गेले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सरकारकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीत वाढ करण्याची मागणी केली आहे. सरकार सध्या साहित्य संमेलनासाठी ५० लाखांचे अनुदान देते, हा निधी २ कोटीपर्यंत द्यावा, अशी मागणी केसरकर यांनी केली आहे. वाढते खर्च पाहून हा निधी वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
या संमेलनासाठी देशभरातून ८०० आणि परदेशातून ५०० जणांची नोंदणी झाल्याचं केसरकर यांनी सांगितलं. यावेळी आमदार आशीष शेलार, आमदार यामिनी जाधव, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, खासदार हेमंत पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.