पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. चिखलफेक सुरू असून टीकेची पातळीही खालावली आहे. कालपर्यंत राष्ट्रवादीत राहून सत्तेची फळे चाखणारे भाजपमध्ये जाऊन पवित्र झाल्यासारखे राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या सारख्या खमक्या नेत्याची गरज आहे.
पिंपरी-चिंचवड शहर बहुभाषिक शहर असल्याने पानसरे यांच्या सारख्या खमक्या नेत्याची राष्ट्रवादीला गरज आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ते राष्ट्रवादीची महापालिकेवर सत्ता आणू शकतात. पानसरे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ समजले जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात पानसरे यांचे वर्चस्व आहे. अनेक नगरसेवक त्यांचे समर्थक आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणण्या इतपत त्यांचा करिष्मा आहे.
पानसरे 2012 ची महापालिका निवडणूक झाल्यापासून राष्ट्रवादीवर नाराज होते. त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर स्थायी समिती सभापतिपदासाठी आमदार जगताप आणि पानसरे यांच्या समर्थकामंध्ये चुरस होती. त्यावेळी अजित पवार यांनी पानसरे यांचे कट्टर समर्थक जगदीश शेट्टी यांना सभापती करून आझम पानसरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
राज्य ग्राहक सल्लागार समितीचे अध्यक्षपद (राज्यमंत्री) बहाल करून लाल दिवा देवून पक्षाने त्यांची नाराजी दुर केली. मात्र, त्या पदावरील व्यक्तीला जास्त अधिकार नसल्याचे सांगत पानसरे नाराजच राहिले.
कालांतराने 2014 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लक्ष्मण जगताप यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे लक्षात येताच पानसरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रीय ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पानसरे हे अत्यंत विश्वासू समजले जातात. शरद पवार यांच्या सांगण्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या वेळी पानसरे पुन्हा स्वगृही परतले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पानसरे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादीने विद्यमान आमदार अनिल भोसले यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर आझम पानसरे राष्ट्रवादीवर नाराज झाले आहेत. त्यांचे समर्थक नगरसेवक, कार्यकर्ते त्यांना भेटायला जातात. त्यांना सक्रिय होण्याची विनंती आणि आग्रह करतात. मात्र, समर्थक, कार्यकर्त्यांच्या विनंती आणि आग्रहाला पानसरे प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते, समर्थक गोंधळात पडले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक मार्च 2017 मध्ये होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रवादीवर आरोपांची राळ उठवली जात आहे. अशा परस्थितीत पानसरे यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. भाजपला सडेतोड भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी पानसरे यांची नाराजी दूर करणे राष्ट्रवादीला गरजेचे आहे.




















