हभप शांतीब्रह्म मारुतीबुवा कुऱ्हेकर : श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव
पिंपरी : श्रीमन् मोरया गोसावी, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पुण्यभूमीतील हा महोत्सव उत्तरोतर असाच वाढत जावा, असे मनोगत आळंदीचे हभप शांतीब्रह्म मारुतीबुवा कुर्हेकर यांनी व्यक्त केले. श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन आळंदीचे हभप शांतीब्रह्म कु-हेकर, राज्यलेखा समिती अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, देहू देवस्थानचे विश्वस्त हभप सुनील महाराज मोरे आणि चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
नगरसेवक संदीप चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका आशा सूर्यवंशी, माजी महापौर व विद्यमान नगरसदस्या अपर्णा डोके, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, माजी नगरसेवक अशोक पारखी, पिंपरी-चिंचवड स्वीकृत सदस्य शरद लुणावत, गजानन चिंचवडे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त सतीश गडाळे, विश्राम देव आदी या वेळी उपस्थित होते.
हभप शांतीब्रह्म मारुतीबुवा कुऱ्हेकर महाराज म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी देवा तूची गणेश आणि स्वयंप्रकाशू असे अगदी समर्पक शब्दांत गणपतीचे वर्णन केले आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठ अशी गणपती देवता आहे. त्याला सर्वात मोठा मान दिलेला आहे. तसेच भगवान शंकरांनीही गणपतीचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. अशा गणपतीचे महानभक्त मोरया गोसावी यांचा हा संजीवन समाधी सोहळा आहे. तसेच या पुण्यभूमीमध्ये आपण कार्यरत आहोत. याचा प्रत्येकाला अभिमान आहे, असे सांगत हा महोत्सव उत्तरोत्तर वाढत जावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
राज्यलेखा समिती अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, देहू देवस्थानचे विश्वस्त हभप सुनील महाराज मोरे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रवचनकार डॉ. यशवंत पाठक यांचे निरुपण झाले. महाप्रसादामध्ये नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचे मोठे योगदान राहणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद महाराज तांबे यांनी केले.
























