अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. किशोरने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सोमवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा कॉल आला.
अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी तपास सुरू केला आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी ज्या नंबरवरून कॉल केला होता तो नंबर शोधला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस मुंबईपासून 70 किमी अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे पोहोचले असता, हा कॉल एका 16 वर्षीय मुलाने केल्याचे समोर आले. हा मुलगा राजस्थानचा रहिवासी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला मुंबईतील आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अभिनेत्याला धमकी देण्यामागे मुलाचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यात सलमान खानला धमकीचा ई-मेल आल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ केली होती. पोलिसांनी या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या विरोधात एफआयआरही नोंदवला होता.
सलमान खानला पोलिसांनी यापूर्वी ‘वाय-प्लस’ श्रेणीची सुरक्षा दिली होती आणि तो त्याच्या वैयक्तिक सुरक्षा कर्मचार्यांसह ‘बुलेट-प्रूफ’ कारमधून प्रवास करतो. वांद्रे पोलिसांनी गेल्या महिन्यात बिश्नोई, ब्रार आणि रोहित यांच्याविरुद्ध खान यांच्या कार्यालयात धमकीचे ई-मेल पाठवल्याचा आरोप करत एफआयआर नोंदवला होता. बिश्नोई सध्या पंजाबमधील तुरुंगात आहे आणि गोल्डी ब्रार हा गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी आरोपी आहे. सलमान खानला जून 2022 मध्ये हस्तलिखित पत्राद्वारे धमकीही देण्यात आली होती. (एजन्सी)