चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम, व्यवस्थापक श्री. तुषार देवरे सर, श्री. वैभव सोनवणे सर, श्री. मुकुल सोनवणे सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ.नीतू पंजाबी मॅम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. मुकुल सोनवणे सर यांनी आंबेडकरांविषयी माहिती देताना सांगितले की हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी भीमराव नावाचा क्रांती सूर्याचा जन्म झाला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या साहेबांनी अतिशय खडतड परिस्थितीत आपली दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी मदत केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व, अन्यायाचा निर्भय शत्रु,भाग्यविधाता, स्त्रियांचे कैवारी, धुरंदर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी होते. त्यांनी गोरगरिबांना त्यांचा हक्क व अधिकार मिळवून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ सोडून दलितोद्धारासाठी कार्य करणाऱ्या या महामानवाचे महानिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले जातिवादाला जोरदार टक्कर देऊन समतेची चवदार ओंजळ भरणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम केले. याप्रसंगी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.