‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य पाहायला आलेल्या प्रेक्षकांचे पेढे वाटून स्वागत करीत आज शंभुराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या ‘जगदंब क्रिएशन’च्या टीमने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली.
आज छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस. राज्यभरात शंभुभक्तांनी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची जयंती उत्साहात साजरी केली. समाजातील तळागाळापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास पोहोचवण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांची ‘जगदंब क्रिएशन’ ही निर्मिती संस्था राज्यात ठिकठिकाणी ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग करीत आहे. या महानाट्याचे प्रयोग मागील ३ दिवसांपासून पिंपरी येथील एच. ए. मैदानावर सुरू आहेत. आज महानाट्याचा चौथा प्रयोग होत असून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या ‘जगदंब क्रिएशन’ निर्मिती संस्थेने आजचा महानाट्याचा प्रयोग पाहायला आलेल्या प्रेक्षकांचे पेढे वाटून स्वागत केले.
छत्रपती संभाजीनगर येथे नव्या भव्य दिव्य स्वरुपातील प्रयोगानंतर ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे नाशिक, निपाणी, कोल्हापूर येथे झालेल्या प्रयोगांना शंभुभक्त प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मोसमाची सांगता स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आणि समाधी असलेल्या पुणे जिल्ह्यात व्हावी अशी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. कोल्हे यांची मनीषा होती. त्यामुळे ११ मे पासून पिंपरीतील एच. ए. मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले असून उर्वरीत दोन प्रयोग सोमवार आणि मंगळवारी होणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, त्यांचे शौर्य, त्यांचा त्याग, धर्म आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान हा ज्वलंत इतिहास अनाथ बालकांनाही समजावा यासाठी डॉ. कोल्हे आणि ‘जगदंब क्रिएशन’ने ठाकूर पिंपरी येथील निर्मल बालविकास संस्थेचे ३० आणि शेल पिंपळगाव येथील संपर्क बालग्राम संस्थेतील ६० अशा एकूण ९० अनाथ मुलांना विशेष निमंत्रित करुन त्यांना मोफत प्रवेशिका देऊन ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग दाखवून आपल्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवलं. तर उद्याच्या प्रयोगाला वढु बुद्रुक येथील माहेर आश्रम स्वयंसेवी संस्थेतील १५० अनाथ मुलांना महानाट्य मोफत दाखविण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती तिकीट काढून महानाट्य पाहू शकतो, पण अनाथ मुलांनाही शंभुराजांचा इतिहास समजला पाहिजे ही यामागची भूमिका होती.