साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये 5 जून 2023 रोजी विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नर्सरी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात स्कूल बॅगसह उत्साहात दाखल झाले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या हस्ते लाल फीत कापून त्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, देवेंद्र रामोळे, वैशाली पाटील तसेच विद्यार्थ्यांनी विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन केले. शाळेच्या शिक्षिका नीतू पंजाबी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. शिक्षकांनी नृत्य प्रदर्शनाद्वारे स्वागत गीत सादर केले. तुषार सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होत असतो. विद्यार्थ्यांचा विविध उपक्रम, खेळ, स्पर्धा अशा अनेक माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला आपले योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी पाच जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा दिवस 1973 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला आहे. हा दिवस पर्यावरण संरक्षणाच्या गरजे बद्दल जागरूकता वाढवण्याचा उद्देश आहे. 2023 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचा पन्नासावा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्षाची संकल्पना आहे “प्लास्टिक प्रदूषणावर उपाय” असून याचे नेतृत्व युनायटेड नॅशनल एन्व्हायरमेंटल प्रोग्राम द्वारे केले जाते. जगभरात दरवर्षी 430 दशलक्ष टनाहून अधिक प्लास्टिक तयार केले जाते. त्यापैकी निम्मे प्लास्टिक फक्त एकदाच वापरण्यासाठी डिझाईन केले जाते.त्यातील दहा टक्क्यापेक्षा कमी प्लास्टिकचा पुनर्वापर होतो. 19 ते 23 दशलक्ष टन प्लास्टिक दरवर्षी तलाव, नद्या आणि महासागरामध्ये मिसळतात. यामुळे प्रदूषण वाढते. मानवी आरोग्य व जैवविविधतेला हानी पोहोचवते. यामुळे सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश स्मिता नेरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दरम्यान, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शालेय प्रांगणात वृक्षारोपण केले. तसेच वर्ग शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे आपापल्या वर्गात स्वागत केले. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी माहिती देताना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या घरासभोवतालच्या परिसराची स्वच्छता व निगा राखावी. एक झाड आपल्या परिसरात लावावे, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन देवेंद्र रामोळे, वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.