शिकून सवरून मोठे व्हा… देशाचे नाव उज्ज्वल करा, असा संदेश देत विद्यार्थ्यांनी घेतल्या तासिका
साक्री : विद्यार्थी मित्रांनो मोठे व्हा… देशाचे नाव उज्ज्वल करा, असा काहीसा नव्या पिढीला संदेश देत विद्यार्थ्यांनी तासिका भरविल्या. निमीत्त होते ते शिक्षक दिनाचे. येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली.
दिवसाची सुरुवात प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीताने झाली. सर्वप्रथम प्रार्थनेच्या वेळी शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांनी बजावली. पहिल्या तासिकेपासून विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या तासिकांचे अध्यापन केले. स्कूलच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सूरू झाला. इयत्ता आठवीच्या हर्ष सोनवणे, लोकेश भदाणे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते सरस्वती माता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यत: समुदायामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सवांचा समावेश असू शकतो. शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना १९ व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली. बहुतेक ठिकाणी स्थानिक शिक्षक किंवा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा साजरा करतात. इतर अनेक आंतरराष्ट्रीय दिवसांपेक्षा भिन्न देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करतात. अर्जेंटिनाने १९१५ पासून ११ सप्टेंबर रोजी डॉमिंगो फॉस्टिनो सर्मिएन्टोच्या मृत्यूचे स्मरण शिक्षक दिन म्हणून केले आहे. भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर) यांचा जन्मदिवस १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. २०२२ मध्ये शिक्षक दिन “अभार दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. १९९४ मध्ये युनेस्कोने स्थापन केलेल्या जागतिक शिक्षक दिनासोबत अनेक देश ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा शिक्षक दिन साजरा करतात, अशी माहिती दिनाप्रती शिक्षकांनी दिली.
निधी पंजाबी (इयत्ता तिसरी), ऋतुजा चिंचोले, समीक्षा देसले (सहावी) या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाबद्दल शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांचा गौरव केला जातो. शिक्षक हा सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक देऊन त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी धडपडत असतो, असे सांगितले. तसेच, एक दिवसाचे शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापन करताना आलेल्या समस्या व अडचणी तसेच मिळालेला आनंद याविषयी आपले विचार मांडले. शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व रांगोळीचे रेखाटन करण्यात आले होते.