पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षक दिनाला वेगळाच रंग आला. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. आजच्या दिवशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांची भूमिका साकारून एक दिवस शिक्षक होण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी वर्गावर जाऊन मोठया उत्साहाने शिक्षकांचे काम केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाबद्दल माहिती व भाषणे दिली. शिक्षक दिन किंवा “टिचर्स डे” जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जागतिक पातळीवर शिक्षक दिन दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, पण भारतात मात्र शिक्षक दिन वेगळ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्याकडे ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. शिक्षक दिन हा आपल्या जीवनातील शिक्षक आणि गुरुच्या स्थानी असलेल्या व्यक्तींना आदर देण्यासाठी साजरा करतात. त्यांच्यामुळे तुमच्या जीवनावर झालेला प्रभाव किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा समुदायासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक करण्याचा हा एक प्रसंग आहे. शाळांमध्ये सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून, डॉ. राधाकृष्णन यांचे स्मरण केले जाते आणि बरेच कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात, अशी माहिती यावेळी शिक्षकांनी दिली. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर गीत सर्वांचे लक्ष वेधले. सर्व शिक्षिकांना विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या ग्रिटिंग कार्ड, फुलगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. शाळेत सुंदर अशा रचनात्मक कार्यक्रमाने रंगत आणली. सरीता अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी सुंदर असे फलख लेखन व रांगोळी साकारण्यात आली होती. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षिकांनी विविध खेळही खेळले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी शिंदे तसेच विद्यार्थ्यांनी केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमीत्त शिक्षक दिन होतो साजरा…
भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते. ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुट्टानी, तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते. ते एक विद्वान, तत्त्वज्ञ होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आला होता. डॉ. राधाकृष्णन १९६२ मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. मात्र, डॉ. राधाकृष्णन यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
शिक्षक आहेत राष्ट्राचा कणा…
शिक्षक दिन हा समाजासाठी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करतो. ते आपल्या राष्ट्राचा कणा आहेत आणि तरुण पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतात. शिक्षक हा तो पाया आहे, ज्यावर तरुणांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. तुमच्या शिक्षकांचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेण्याची, त्यांनी तुम्हाला चांगले कार्य करण्यास आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी कशी प्रेरणा दिली याची आठवण करून देण्याची आणि त्यांच्या मेहनतीचा आदर करण्यासाठी शिक्षक दिन ही एक उत्तम संधी आहे.
कसा साजरा केला जातो शिक्षक दिन?
दरवर्षी शाळा सांस्कृतिक उत्सव आयोजित करून शिक्षक दिन साजरा करतात. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या शिक्षकांना चॉकलेट, फुले, भेटवस्तू, हाताने तयार केलेले कार्ड भेट देतात आणि भेटवस्तूंद्वारे त्यांचे स्नेह व्यक्त करतात. याव्यतिरिक्त, वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी भूमिका उलट करण्याचा एक प्रकार म्हणून शिक्षक म्हणून वर्गांमध्ये जाऊन शिकवतात. विद्यार्थी शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षक विश्रांती घेतात आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेतात. भूमिका बदलण्यामागे हेतू असा आहे की, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या स्थानी जाऊन त्यांची भूमिका समजून घेता येते.