प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा साक्री येथे विज्ञान दिन कार्यक्रम
ज्ञानवर्धक वातावरणात उत्साहात पार पडला




साक्री (प्रतिनिधी) – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि नवोपक्रमशील विचारांना चालना मिळावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संयोजक श्री श्रावण अहिरे व श्री प्रथमेश सोनवणे यांनी नियोजनपूर्वक कार्यक्रमाची आखणी केली. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी सौ तेजस्विनी घरटे यांनी यशस्वीपणे पार पाडली. समन्वयक श्री वैभव सोनवणे व श्री तुषार देवरे यांनी सहकार्य करून कार्यक्रम सुरळीत पार पाडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत भीमराव पाटील उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाकडे जिज्ञासू वृत्तीने पाहण्याचा आणि प्रयोगशीलतेचा अंगीकार करण्याचा संदेश दिला. “विज्ञान म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे नव्हेत, तर विचार करण्याची आणि समस्यांचे समाधान शोधण्याची पद्धत आहे,” असे ते म्हणाले.
शाळेच्या प्राचार्या सौ वैशाली लाडे यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवकल्पनांकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. विज्ञान दिनानिमित्त सौ मनीषा माळी व श्री वैभव जोशी यांनीही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनजोपासण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्रावण अहिरे व सौ हेमांगी बोरसे यांनी प्रभावीपणे केले. तसेच श्री प्रथमेश सोनवणे व सौ अश्विनी खैरनार यांनीही सूत्रसंचालनात सहभाग घेत कार्यक्रम अधिक आकर्षक बनविला.
विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विज्ञान विषयातील आपले ज्ञान सिद्ध केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचा उद्देश सफल झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.















