साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठया उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे तसेच कार्यक्रमाचे संयोजक देवेंद्र रामोळे यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या भगव्या पोशाखामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त शाळेचे शिक्षक कुणाल देवरे यांनी माहिती दिली. छत्रपती शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज १६ वर्षाचे असताना, मोजक्याच मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी मराठ्यांचे स्वतंत्र आणि सार्वभौम असे स्वराज्य निर्माण केले. ज्यावेळी मराठ्यांचे स्वतंत्र असे साम्राज्य असावे, असा विचार करण्यासही कोणी धजावत नव्हते. अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी विधिपूर्वक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून१६७४ ला स्वतःचा राज्याभिषेक केला. याच अभूतपूर्व सोहळ्याला शिवराज्याभिषेक अथवा राज्याभिषेक सोहळा असे म्हणतात.
कार्यक्रमानिमित्त इ. ४ थी चा विद्यार्थी पुनीत चेतन ठाकरे ( छत्रपती शिवाजी महाराज), इ.५वी ची विद्यार्थिनी गुंजन गणेश पाटील( राजमाता जिजाऊ ), आयुषी अभय सोनवणे, निधी जॅकी सदाना यांनी सईबाई यांचा पोशाख परिधान केला होता. या सर्वांचे स्वागत पुष्प वर्षावाने करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या व राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने झाली.