जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त वृक्षारोपणाने स्कूलच्या पहिल्या दिवसाची सुरुवात
साक्री : उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या असून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करुन गुलाबपुष्प, खाऊ वाटप करण्याबरोबर विविध उपक्रम राबवून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त वृक्षारोपण कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. सकाळी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्राचार्या वैशाली लाडे यांच्या हस्ते फीत कापून, विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांच्या वर्षावाने मुलांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजली. तर, पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या बच्चे कंपनीने नव्या मैत्रिची सूरुवात केली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रीमती सपना देवरे यांनी माहिती दिली. त्यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व विषद केले. ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्येला तोंड देत आहोत, याचे कारण म्हणजेच मानवाने केलेली पर्यावरणाचे हानी व ती भरून काढण्याविषयीच्या उपायांची माहिती दिली. तसेच जागृती मॅडम यांनी “झाडे लावा झाडे जगवा” या घोषणा देऊन विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले. झाडे लावले तर निसर्गामध्ये पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा व भरपूर पाऊस मिळेल हा मौलिक संदेश दिला. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले. तसेच शाळेच्या आवारात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे तर कार्यक्रमाचे संयोजन तुषार सूर्यवंशी यांनी केले.