पावसाळी क्रिकेट स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा दणदणीत विजय
अंतिम सामन्यात साक्री न्यू इंग्लिश स्कूल, आदर्श विद्यामंदिर संघाचा केला पराभव
साक्री : धुळे जिल्हा क्रिडा विभागामार्फत सन-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील १४ व १७ वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या दणदणीत विजय मिळविला.साक्री शहरातील पेरेजपूर क्रिकेट मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटातील दोन्ही संघांनी विजय मिळविला. या स्पर्धेत प्रत्येक सामना ६ षटकांचा खेळविण्यात आला.
पहिला सामना प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री व न्यू इंग्लिश स्कूल, साक्री यात रंगला त्यात प्रथम फलंदाजी करतांना १४ वर्षीय वयोगटातील विद्यार्थी खेळांडूनी ६ षटकात ४९ धावा बनवून समोरच्या संघाला आव्हान दिले. परंतु, विरोधी संघाला ११ ते १२ धावांवर रोखून प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने सहज विजय मिळवला.
१७ वर्ष वयोगटातील अंतिम सामना प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री, विरूद्ध आदर्श विद्यामंदिर- निजामपूर जैताणे यांच्यात रंगला. यामध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्रथम फलंदाजी करतांना ६ षटकात ५३ धावांचे विरोधी संघाला आव्हान दिले. मात्र, प्रचिती स्कूल संघाच्या भेदक गोलंदाजांनी आदर्श विद्यामंदिर संघाला केवळ ३१ धावातच रोखून अंतिम सामन्यात विजय मिळवला.
यात १४ वर्ष वयोगटातील संघाचे नेतृत्त्व कर्णधार- सिध्दांत पाटील आणि १७ वर्ष वयोगटातील संघाचे नेतृत्त्व विनित देवरे या खेळाडूंनी केले. या क्रिकेट स्पर्धेसाठी शाळेचे क्रिडाशिक्षक वैभव सोनवणे, कुणाल देवरे, अभिषेक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही संघातील यशस्वी खेळाडूंच्या विजयी कामगीरीबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्यां वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील खेळाच्या कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या.