बहिण ओवाळीते भाऊराया रक्षाबंधन सणाला; प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये बहिण-भावाच्या प्रेमाच्या बंधनाची गुणगुण
साक्री : बहिण ओवाळीते भाऊराया, रक्षाबंधन सणाला अशी गुणगुण साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज ऐकावयास मिळाली. रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो. जो उत्सव सर्वाना अखंड प्रेम, उत्साह, स्नेहभाव, संबंधामध्ये मधुरता आणि पवित्रता घेऊन येतो. या वर्षाची रक्षाबंधन सण हा 19 ऑगस्ट ला संपन्न होणार असल्याने सर्वच ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो.असाच क्षण आज प्रचिती स्कूलच्या प्रांगणात अनुभवता आला.
शनिवारी रक्षाबंधन सण निमित्ताने साक्री शहरात कार्यक्रमाचे आयोजन शाळेमार्फत करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता १०वीच्या विद्यार्थीनींनी न्यायालय, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय या ठिकाणी भेट देऊन सरकारी न्यायाधीश, पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, तहसीलदार व इतर कर्मचारी यांना राखी बांधून भाऊबहिणीच्या रक्षणाची व बंधनाची जाणिव करून दिली.
पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर “सद रक्षणाय , खल निग्रहणाय ” हे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधुन समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारीची भावना वाढीस लागली. तसेच शासकीय रुग्णालयातील रुग्ण व रुग्ण सेवा करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांच्यामध्ये एकमेकांविषयी बंधूभावनेने रुग्णसेवा करण्याची प्रेम व आपुलकीची भावना निर्माण करणारा असा हा आजचा रक्षाबंधनाच्या कार्यक्रम ठरला. त्यानंतर शाळेच्या परिसरात मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. सुरवातीला शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्या वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे,शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. अतिथीच्या स्वागत सत्कारानंतर गीतांजली काकुस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली इ. २री च्या विद्यार्थ्यांनी “फुलो का तारो का …सबका काहणा है…एक हजारो मे मेरी बहना है! “या गीतावर सुंदर नृत्य सादर केले.






मनिषा बोरसे यांनी आपल्या भाषणातून, रक्षाबंधन सणाचे महत्व विषद केले. समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्खा बहिणीने सख्खा भावाला राखी बांधण्यापेक्षा एखाद्या बहिणीने दुसऱ्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. रक्षाबंधन म्हणजे बहिण- भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पुरक आहेत. हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमुल्य देण आहे, असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. त्यानंतर इ. नर्सरी ते इ. १०वी पर्यतच्या प्रत्येक मुलींनी मुलांचे औक्षण करुन राख्या बांधल्या. मुलांनी देखील आपल्या बहिणींना भेट वस्तू दिल्या. रक्षाबंधन हा सण आपल्याला आपली परंपरागत संस्कृती टिकविण्याचा संदेश देतो. असा संदेश भाषणातून श्रावण अहिरे यांनी दिला. सूत्रसंचालन सविता ठाकरे यांनी केले. तर संगीत संयोजन गणेश नांद्रे यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन वैशाली खैरनार, रोहिणी अहिरराव, मनिषा बोरसे व प्रफुल्ल साळुंके यांनी केले.




















